ब्राह्मण, सीकेपींसाठी स्वतंत्र महामंडळ विचाराधीन.
मुंबई : ब्राह्मण, सीकेपींसह खुल्या प्रवर्गातील समाजाची नाराजी दूर करण्यासाठी स्वतंत्र महामंडळ स्थापन करण्याचा प्रस्ताव राज्य सरकारच्या विचाराधीन आहे. खुल्या प्रवर्गासाठी सारथीच्या धर्तीवर अमृत संस्थेची स्थापना केली असली तरी शासकीय दुर्लक्षाकडे ही संस्था सध्या कागदावरच आहे. मराठा समाजासाठी सारथी संस्था आणि अण्णासाहेब पाटील महामंडळ, ओबीसींसाठी महाज्योती संस्थेसह विविध योजनांच्या माध्यमातून युवक, महिला, उद्योजक, व इतरांसाठी वेगवेगळ्या पद्धतीने सहाय्य केले जाते.
अमृत या संस्थेची स्थापना २२ ऑगस्ट २०१९ रोजी करण्यात आली होती.त्यानंतर महाविकास आघाडीचे सरकार मध्ये ही संस्था कागदावरच राहिली. या संस्थेची नोंदणी कंपनी कायद्यानुसार करून मुख्यालय पुण्याऐवजी नाशिकला ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे-उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सरकारने मुख्यालय पुन्हा पुण्याला सुरु करण्याचा निर्णय १२ आगस्ट २०२२ रोजी घेतला. संस्थेची नोंदणी कंपनी कायद्याऐवजी संस्था नोंदणी कायद्यानुसार करण्याचाही निर्णय घेण्यात आला.
सरकार खुल्या प्रवर्गासाठी महामंडळ स्थापन करण्याचा विचार करीत असल्याचे सूतोवाच मंत्री अतुल सावे यांनी केले आहे तसेच ब्राम्हण समाजासह खुल्या प्रवर्गासाठी स्वतंत्र महामंडळ स्थापन करून भरीव निधीची तरतूद करण्याचा प्रस्ताव राज्य सरकारच्या विचाराधीन असल्याची सूत्रांची माहिती आहे.